सोमवार, २७ जून, २०११

ये ना गं..

तिचा तो प्रेमळ-उष्ण स्पर्श..
सत्य कळल्यावर दिलासा देण्यासाठी
पुढे केलेला तो हात
माझ्या हातावर विसावला तो कायमचाचं....
तो उष्ण स्पर्श शेवटचा होता ह्यावर
माझा अजून विश्वास बसत नाही..
ये ना गं.. प्लीज ये ना..


ती अजूनही आकाशाकडे डोळे लावून
विनवणी करतेयं तिला..
कदाचित आकाशातून बघत असेल ती हिला
मी अस्वस्थ असताना..
अभाळाची मऊ कुशीही बोचत असेल ना तिला?
जेव्हा हे जाणवतं..
तेव्हा ती खडबडून उठते.. डोळे पुसते..
आभाळाकडे बघतं तिला सांगते..
अगं मी मजेत आहे..
तूला माहित्येय ना मध्येच असे झटके येतात मला
तू तिथे सुखी रहा..


पण तिला मनातला आवाजही येत असेलच की
आता खर तर अंतर संपलयं
मग तिची ओढ का?


हा खेळ बहुदा हिच्या शेवटच्या श्वासापर्यंत चालेल
ते तिने दिलेल्या श्वासांचं ऋणचं म्हणायचं


...स्नेहा

शुक्रवार, २४ जून, २०११

Just wants to say Love You All..

लहानपणी पेल्यातल्या वादळानं किती गडबडून जायाचो ना आपण? आता खरी वादळं जोमानं झेलतो तरी त्या वादळाचं अप्रृप वाटतं.. प्रामाणिकपणे सांगायचं झाल तर ती वादळ स्वीकारली तर त्यांच्याशी खेळायला मजा येते.. मग काही दिवसांनी त्या वादळाच काही अप्रृप वाटणंचं बंद होतं... रोज रोज नव्यानं येणारी अवघड परिस्थिती.. पहिल्यांदा काहीशी घाबरवते.. मग हट्टी स्वभावाला chalenge करते.. मग आपण मात करतो त्या परिस्थितीवर... पण मग त्याचा आनंद वाटतोय न वाटतो तर दुसरं challenge... रोज रोज भांडण.. स्वत:च्याच आयुष्याशी..पर्याय नसतो दुसरा.. सामोरं जायाचं नाहीतर हरायाचं इतकच..गम्मत याची वटते सामोरे जातो तेव्हा लोकं पाठ थोपटतात आणि बावरून थांबतो तेव्हा सुरूवातीला कुरवळणारी हिच लोकं नंतर झटकतात.. अर्थात ही स्थिती येऊ द्यायचीच नाही कधी स्वत:वर.. नाहीतर स्वत:चा अपमान स्वत: करून घेतल्यासारख होतं..आणि ही स्थिती येतही नाही कारण आपली माणसं असतात..सख्खी नसतील कदाचित पण सख्याहून कितीतरी जास्त.. तेव्हा जाणवतं देव निष्ठूर नक्कीच नाही ... आपल्या जवळची माणसं खुप कमी असतील कदाचित पण ती आपली असतात... ती असणं हे देवबप्पाचा आपल्यावर विश्वास असतो...त्या शिवाय आजारपणात सेवा करणारे आपले गुरू आणि त्यांचं कुटूंब भेटत नाही वा मित्र-मैत्रिण असणारे तरी वडीलकीचं नातं जपणारी माणसं.. अचानक हॉस्टेल सोडाव लागणार ऐकताच डोक्यावरचं छत उडण्याची भिती नुसती मैत्रिणीला बोलून दाखविली तर कोणाला घर मिळत? नाही ना.. माझ्या देवानं मला अशी मैत्रीण दिली... माझी मैत्रीण... फक्त वाईट याचचं वाटतं मला या सगळ्यात ..माझ्या भावना व्यक्त करण्याचं माध्यम कोरड होत गेलं या वादळांमध्ये...झरा आटला शब्दांचा..पण भावना कोरड्या नाही झाल्या..माझं माझ्या या माणसांवर खुप खुप प्रेम आहे.. त्यांनी खुप दिल म्हणून नाही.. काही दिल नसतं तरी होतं.. आहे..फक्त व्यक्त करता येत नाही इतकंच... आज इतकंच सांगायचयं love you all :) मी एकटी झुंजत नाहिये तूम्ही आहात सोबत..तुम्ही असण ही ताकद आहे माझी...


स्नेहा

सोमवार, १३ जून, २०११

Dear पाऊ(सा)

Dear पाऊ(सा)


तू आलास..finaly...:)
कसला गोड आहेस माहित्ये तू? तू आलास की सगळ वातावरण सही होतं... प्रत्येक जण पहिल्या सरी साजर्‍या करताचं रे... लहान मुलांपासून थोरा-मोठ्यांचा तू लाडकाचं पण या वेळी तूला पत्र लिहिले कारण वेगळयं.. पाऊ एकशील का रे माझ एक? छान पड तू.. भरभरून कोसळ.... पण आभाळातूनच.. यावेळी तरी कोणाच्या डोळ्यातून पाझरू नकोस.. मला माहित्येय प्रत्येक ऋतूला शापच आहे.. ग्रेस म्हणतात तसा.. रोज बोलतोच आपण पण आज तूला विनंती करायची होती म्हणूनहे लिहीत बस.. प्लीज... पाऊ येत राहा..पण आनंद घेऊन तूला कोणी वाईट म्हणालेलं मला नाही आवडणारं..बोलत राहूच आपण..

तूझीचं
...स्नेहा

रविवार, ८ मे, २०११

एक ‘शालीन’ सासू

सासू-सुन हा भारतीय लोकांसाठी विषेतः महिलांसाठी नेहमीचाच हॉट टॉपिक.. सासू-सुनांच्या पराकोटीच्या भांडणांची आपली परंपराचं.. त्यातल्या त्यात आपण नेहामीच आपल्या टि.व्हीपासून शेजारच्या घरात हे वाद पाहतो की एखादी खाष्ट सासू सुनेचा कसा छळ करते.. किंवा एखादी खाष्ट सून म्हातार्‍या सासूचा छळ करते.. पण २१व्या युगात हे चित्र बदलताना दिसतयं.. आता सासवाही सुनेच्या खांद्याला खांदा लाऊन सूनेसोबत मॉल मध्ये शॉपिंग करताना दिसतात... आणि आईसक्रीमची चव चाखत एकत्र बसून सासू-सुनांच्या छळवादी सिरियलसचा आनंद लूटतात... या सासू सुनांना बदलत्या परिस्थितीमुळे का होईना पण नात्यातला तो हळूवार धागा सापडलायं.. ह्या सासवांनीही नोकरी केली..त्यामुळे त्यांना त्यांच्या सुनांचे प्रश्नाची-अडचणींची जाणीव आहे.. त्यामूळेच त्यांनी सुनेच्या संसारात कमी लुडबुड करून जगा आणि जगू द्या हे धोरण स्वीकारलयं...
मात्र.. या अधुनिक युगातल्या सुशिक्षित असलेल्या काही सासवांना सूनेचा मानसिक छ्ळ करताना पहिलं तेव्हा जाणवलं सासू-सुनांची ही दुखरी परंपरा जपण्याचं-जोपासण्याचं जणु व्रतच ह्या सासवांनी घेतलयं. माझ्या पाहण्यातली अशीच एक सासू आहे. विशेष म्हणजे ही सासू निवृत्त शिक्षिका आहे..तिला तिच्या विद्यार्थांनी आदर्श शिक्षिका म्हणून गौरविले सुध्दा..पण वैयक्तीक आयुष्यात मात्र ही ‘शालीन’ सासू आपली लीनता पार विसरून गेलीये.. ती फक्त तिच्या सूनेचाच नाही तर मुलाचाही मानसिक छळ करते.. तेव्हा जाणवतं की ही बाई साक्षर-शिक्षित आहे पण सुशिक्षित नाही.. मग मनाला प्रश्नही पडतॊ की ही माणसं जगासमोर तरी चांगुलपणाचा मुखवटा का चढवतात? घरात स्वतःही मोकळेपणानं जगत नाही ना पोटच्या मुलाला जगू देत ना सूनेला.. दुसर्‍यांचा छळ करून काय मिळत त्यांना एक असुरी आनंद..असुरी समाधान? यांना देव आईपण द्यायलाच विसरला का?
येता-जाता मुलाचा आणि सूनेचा अपमान.. मुलाला तूला डोकच नाही म्हणून हिणवायचं. सुनेला येताजाता सुनवायचं.. स्वतःच्या मैत्रिणींसमोर आव आणायचा की मला किती त्रास होतोय..ही वेळेवर जेवणही करत नाही... वस्ताविक पाहता ह्या बाईला निसर्गानं बहाल केलेलं आईपणही साध्य करता आलं नाही.. स्वतःच्या मुलाला तिने कधी वेळेवर जेवायलाही वाढलं नाही.. भरवणं तर दूरचं... ह्या नापास आईचा मठ्ठ मुलगा मोठ्या ऑरगनाझेशनमध्ये मोठ्या हुद्यावर आहे.. महिन्याला लाखभरतरी पगार घरी आणतो.. तरी आईच्या लेखी तो मठ्ठ्चं आहे.. तो मुलगा आईसमोर स्वतः सिध्द करण्याचा निरर्थक आटपिटा करतोयं.. त्या बाईमध्ये आई शोधतोय.. या सगळ्या गोंधळात तो आपल्या बायकोला होणारा त्रास तिचा होणारा छळ तो कोरडा होऊन पाहतोयं.. आणि ती सून मुग गिळून सगळ मुकाट्याने सहन करतेयं...लग्नानंतर १०-१५ वर्ष झाल्यानंतर्ही ह्या सुनेला आई-वडिलांवरून टोमणे एकावे लागतात.. बाळंतपणात ती त्रासाने अक्षरशः मरणाच्या दारातून परत आली..त्यावेळेस खर्च झालेल्या पैशावरूनही त्या सासूने टोमणे मारले ही हद्द होती त्या सासूची.. खर तर तिच्या या परिस्थितीला कुठे नं कुठे सासूस जबाबदार होती... ह्या आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार मिळवणार्‍या बाईला स्त्रीपणाही जपता आलं नाही ही खंतच आहे.. आजी झाली तेव्हाही सून जरा बाहेर गेली तरी नातीची काही वेळ जबाबदारी घ्यायला सांगितली तर त्यातही यांचा नकार... चिमुकल्या नाती कडे बघुन तरी ह्यांच आजीपण जागायला हवं नं? पण नाही ह्या आजी म्हणूनही नापास ठरल्या...हे सगळ चित्र बघुन मला नेहमी वाटतं हे वेगळे का होत नाहीत.. कदाचित त्या नापास आईला.. नापास शिक्षिकेला एकटं पडलं तर सख्ख्या माणसांची किंमत तरी कळेल...आणि आयुष्याच्या उत्तरार्धात तरी त्या विक्षिप्त बाईला.. स्त्रीपणाची.. आईपणाची..जाणीव होईल..
हे झाल एक उदाहरण...एका सासूच.. या अधुनिक काळात अशा ब‍‍र्‍याच सुशिक्षित सासवा आहेत. ज्या आपल्या सुनांचा असा छ्ळ करतात..अर्थात छ्ळ सहन करणार्‍या सोशिक सुनांची संख्या कमी असली तरी आहे..हे महत्वाचं.. कदाचित सु्शिक्षित स्त्रीयांच्या आत्महत्येच प्रमाण वाढण्याच हेही एक कारण असावं.. या स्त्रीयांना न्याय केव्हा मिळणारं.. आणि अधुनिकतेची वाटचाल करणार्‍या आपल्या भारताला लागलेलं सासू-सुनांच्या नात्यातल्या कडव्या-दुष्ट परंपरेच ग्रहण केव्हा सुटणारं हे देवच जाणे.. पण याचा प्रत्येक स्त्रीने विचार करायला हवा हे नक्की...

(हे सगळ इथे लिहण्याचे कारण हेच की कदाचित हा लेख एखाद्या खाष्ट सासूच्या वाचनात आला तर काही तरी जाणीव होईल तिला स्वतःच्या स्त्रीत्वाची)

शनिवार, २३ एप्रिल, २०११

न कळे तूला भाव मनीचा

हुरहुर नुसतीचं दाटे...

जगण्याला अर्थाचा फुटला मोहर

क्वचित हाती काटे लागे ..

न कळे ..



हुरहुरतो मग जीव

त्याला धूंदी सुखाची

एका काट्याची जखम बोचरी

दवा म्हणुन फुंकर हवी तूझी..

न कळे ..


हे सारे तूला उगाच वाटे

मग कंठ माझाही दाटे..

सारं मनीच लपवूनी मग

ऊरी हुरहुर साठे..

न कळे ..


सारेचं क्षणीक हे

आहे ठाऊक मज

उद्या उमलण्यासाठी

आजचा हा साज...

न कळे ..



...स्नेहा

गुरुवार, ३१ मार्च, २०११

काही नाही गवसेल कधीतरी जगण्याचा अर्थ तुला

काही नाही गवसेल कधीतरी जगण्याचा अर्थ तुला
जगताना खुणावतील कधी शब्दांपलीकडले अर्थ तुला..
तेव्हा तू थांब क्षणभर..
तेव्हा तू थांब क्षणभर..
त्या शब्दांकडे पहा...
तेव्हा तुला दिसेल ..
त्या शब्दांच्या अर्थापलीकडला...
भावनांचा कल्लोळ....
काही नाही गवसेल कधीतरी जगण्याचा अर्थ तुला....


.... स्नेहा

मंगळवार, २९ मार्च, २०११

असचं मनाला हवं म्हणुन.....

काहीतरी लिहण्यासाठी पर्रफेक्ट मुड असावा हा... काही कारण नसताना उगाच उदास का वाटावं? मग ते कारण शोधण्यासाठी लिहायला घ्यायाचं हे ठरलेलयं हं .. कारण हे मन जे मला सांगत नाही ते त्या कागदाला किंवा आता या स्क्रीनला सांगायाला लागात... सालं या मनाचही झेपतचं नाही राव.. काय हवयं त्याला? जा... आता माझाही हट्टचं आहे.. कागद किंवा या स्क्रिन आधी तू मला सांग काय झालयं तूला.......... 8-|

बर्‍याचदा मी माझ्या मनाला अशीच दटावत आले.. मग माझं लिहणंचं थांबलं.. कुठेतरी माझाच माझ्याशी संवाद तूटला.. आज एकदम जाणवलं हे... कारण आजही माझं मन माझ्या पेक्षा कागदाकडे मोकळ होऊ पाहतायं... बघु येत्या दिवसांत कदाचित ब्लॉग परत भरू लागेल अशी चिन्ह आहेत.. मनाशी पंगा कोण घेणार यार?

शनिवार, ५ मार्च, २०११

काही तरी मिसिंग आहे यार.

काही तरी मिसिंग आहे यार....

तो अस्वस्थ ... पेन.. आहे
कागदही.. आहे...
टेबल, दिवा..वातावरण.. सगळं सगळं आहे पण..

च्यायला.. काहीतरी मिसिंग आहे....

सुचत नाही का सुधरत नाही...
इच्छा आहे पण सालं काही उमटतचं नाही...
काही तरी मिसिंग आहे यार....

समोरची खिडकी जरा कलकलली
झाडावरची पालवी जरा सळसळली
.
.
जाऊदे जमत नाही काही
काही तरी मिसिंगच आहे यार....

स्नेहा

मंगळवार, १ मार्च, २०११

मी.. ती.. मी..?????

कधी हरवते.. कधी बावरते...
ही जाणीव कधी थरथरते...

कधी भिजवणारी मी
कधी भिजणारी मी
तर कधी कोरडी चिट्ट मी..
अजाणीवेच्या गर्तेत हरवलेली मी..
तरी 'मी' च्या शोधात गुंतलेली मीच...
कधी हरवते.. कधी बावरते...
ही जाणीव कधी थरथरते...

माझ्यातली ती... दुष्ट, क्रुर..
ती हट्टी.. मग्रुर..
माझ्यातली तीच कधी हळवी.. हळुवार
माझ्यातली 'ती' '?'
कोण ती? कोण मी?
कधी हरवणारी? कधी बावरणारी?
का कधी जिची जाणीवच थचथरते ती?